ई-पीक पाहणी नोंदणीस मुदतवाढ; आता ‘ही’ आहे शेवटची तारीख

e pik pahani last date : महसूल विभागामार्फत राज्य ई-पीक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतक-यांना आपला पीक पेरा स्वतः नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या नोंदणीची मुदत रविवार दिनांक १५ सप्टेंबर होती; मात्र, अद्यापही काही शेतकर्‍यांनी ई पीक पाहणी अ‍ॅपद्वारे पीक पेरा नोंदविला नसल्याने शेतकर्‍यांना नोंदणीसाठी दि.२३ सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली आहे.

ई-पीक पाहणी मुदतवाढ

नाशिक विभागातील सर्व शेतकर्‍यांनी खरीप हंगामात केलेल्या पिकांची नोंद ई-पीक पाहणी अ‍ॅपद्वारे पूर्ण करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. खरीप हंगाम २०२४-२५ करिता शेतकरी स्तरावरील पीक पाहणी नोंदवण्यासाठी महसूल दिनापासून म्हणजेच १ ऑगस्ट 2024 पासून सुरुवात झाली होती.

दि. १५ सप्टेंबर 2024 पर्यंत शेतकरी स्तरावरील पीक पाहणी करता येणार होती. परंतू, राज्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी विहीत मुदतीत पूर्ण झाली नसल्याचे निदर्शनास आल्याने राज्यशासनाने शेतकरी स्तरावरील या नोंदणीसाठी दि.२३ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याचे विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी जाहीर केले आहे.

इतकी ई-पीक पाहणी पूर्णत्वास

खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये दि. १३ सप्टेंबर पर्यंत नाशिक विभागात १५ लाख ४८ हजार ६२२ हेक्टर इतक्या क्षेत्रावरील ई-पीक पाहणी पूर्ण झाली आहे. तर जवळपास १६ लाख ४७ हजार ५६ हेक्टर क्षेत्रावर पीक पाहणी नोंदविण्यात आलेली नाही.

राज्य शासनाने “माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदवणार माझा पीक पेरा” च्या उद्देशाने स्वतः च्या शेताची पीक पाहणी स्वतः करण्याची संधी ई पीक पाहणी अ‍ॅपद्वारे राज्यातील सर्व शेतक-यांना उपलब्ध करून दिली आहे. पीक विमा, नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे तसेच भूसंपादन इ. करिता ई-पीक पाहणी अ‍ॅपद्वारे शेतकर्‍यांनी पीक पाहणी नोंदविणे अत्यंत आवश्यक आहे, असे आवाहनही विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी केले आहे.

ई पीक पाहणी समस्या निवारण

ई-पीक पाहणी करण्यामध्ये काही समस्या असल्यास ०२०२५७१२७१२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करुन मदत घेता येऊ शकते. इंटरनेटची (Internet) आवश्यकता फक्त शेतकरी नोंदणी वा पिक पाहणी अपलोड करणेकामी आवश्यक आहे. त्यामुळे ज्या शेतामध्ये इंटरनेट सुविधा नाही, त्याठिकाणी सुद्धा पीक पाहणी करता येते. सहाय्यक, तलाठी स्तरावरील पिक पाहणी नोंदविण्यासाठी देखील सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून, आता दि.२४ सप्टेंबर ते दि.२३ नोव्हेंबर या कालावधीत सहाय्यक, तलाठी पीक पाहणी नोंदवू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

ई-पीक पाहणी स्टेटसयेथे क्लिक करा
ई-पीक पाहणी फायदा नुकसानयेथे क्लिक करा
ई-पीक पाहणी ॲपयेथे क्लिक करा

Leave a Comment