ऊसतोड कामगारांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी शासनाकडून गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना सुरू करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये साखर उद्योग हा मोठ्या प्रमाणावर चालणारा उद्योग असून सध्या स्थितीमध्ये राज्यात जवळपास 127 सहकारी क्षेत्रातील व 129 खाजगी क्षेत्रातील साखर कारखाने आहेत. ज्या अंतर्गत 8 ते 10 लाख ऊसतोड कामगार या क्षेत्रात काम करतात. बहुतांश ऊसतोड कामगार मराठवाडा विभागातील व विशेषता बीड तसेच अहमदनगर, जालना, नांदेड, परभणी, धाराशिव, लातूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव या जिल्ह्यातील आहेत.
गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना
ऊस तोडणी व वाहतूक करताना वाहतूक कामगारांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. ज्यामध्ये अपघात, सर्पदंश, विजेचा शॉक, नैसर्गिक आपत्ती, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात इत्यादी विविध कारणे आहेत. परिणामी ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांना मृत्यू ओढवतो किंवा काही परिस्थितीत अपंगत्व येते. घरातील कर्ता व्यक्ती अपघातामुळे मृत्यू पावल्यास किंवा अपंग झाल्यास घरातील उत्पन्न बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते.
अशा अपघात ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादमास व त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळामार्फत राज्यातील ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांच्यासाठी झोपडी व बैलजोडी यांच्याकरिता अपघात विमा योजना त्याचप्रमाणे झोपडी व बैलजोडी यांच्याकरिता विमा संरक्षण योजना राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये सदर विषयाबाबत सविस्तर चर्चा होऊन राज्यातील ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम त्यांचे झोपडी व बैलजोडी यांच्याकरिता ” गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना ” राबविण्याबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे.
योजनेअंतर्गत मिळणारे लाभ
गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थी कामगारांना खालीलप्रमाणे विविध लाभ अनुज्ञेय असतील.
| बाब | सानुग्रह अनुदानाची रक्कम |
|---|---|
| आग झोपडी आणि सामग्री | रु. 10,000/- |
| वैयक्तिक अपघात (मृत्यू) | रु. 5,00,000/- |
| वैयक्तिक अपघात (अपंगत्व) | रु. 2,50,000/- |
| वैयक्तिक अपघात – वैद्यकीय खर्च | रु. 50,000/- |
| बैलजोडी लहान – मृत्यू/अपंगत्व | रु. 75,000/- |
| बैलजोडी मोठी – मृत्यू/अपंगत्व | रु. 1,00,000/- |
वरील बाबीनुसार ऊस गाळप हंगामाच्या कालावधीत ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांना किंवा त्यांच्या बैलांना केव्हाही अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास या योजनेअंतर्गत वरीलप्रमाणे लाभ देण्यात येईल.
गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजनेच्या लाभास पात्र असणाऱ्या ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांनी किंवा त्यांच्या वारसदारांनी इतर शासनाच्या कोणत्याही अन्य विभागाकडून अपघातग्रस्तांसाठी कार्यान्वित असलेल्या योजनांचा लाभ घेतलेला असेल, तर त्यांना सदर योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी लाभार्थी कामगारांना अर्जासोबत खालील कागदपत्रे सादर करणे अनिवार्य असेल.
- ग्रामसेवक यांच्याकडील ऊसतोड कामगार असल्याबाबत ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र
- मृत्यूचा दाखला
- आधार कार्ड
- ऊसतोड कामगारांचे वारस म्हणून गाव कामगार तलाठ्याकडील गाव नमुना नंबर 6 नुसार मंजूर झालेली वारसांची नोंद
- ऊसतोड कामगारांच्या वयाची पडताळणी करण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला/आधार कार्ड/मतदान कार्ड इत्यादी
- प्रथम माहिती अहवाल/स्थळ पंचनामा/पोलीस पाटील माहिती अहवाल
- झोपडी आणि सामग्रीचे वस्तूंचे आग/दंगल/संप/वादळ महापूर इत्यादीमुळे नुकसान झाल्यास नुकसानीचा फोटो, नुकसानीची यादी, पंचनामा
- अपघाताच्या स्वरूपानुसार प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे सविस्तर शासन निर्णयात देण्यात आलेली आहेत.
वारसदार पात्रता प्राधान्यक्रम
गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ योजनेअंतर्गत अनुदानासाठी मृत कामगारांचे वारसदार खालील प्राधान्य क्रमाने पात्र असतील.
- मृत कामगाराची पत्नी/पती
- मृत कामगाराची अविवाहित मुलगी
- मृत कामगाराची आई
- मृत कामगाराचा मुलगा
- मृत कामगाराचे वडील
- मृत कामगाराची सून
- अन्य कायदेशीर वारसदार
गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांच्या वारसदारांना तातडीने मदत मिळवण्यासाठी शासन निर्णयाच्या प्रस्तावनेत नमूद जिल्ह्याकरिता जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे.
संबंधित योजनेची काटेकोरपणे अमलबजावणी करण्याची जबाबदारी व्यवस्थापकीय संचालक, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ, पुणे यांची राहील. तसेच व्यवस्थापकीय संचालक, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ, पुणे यांनी योजनेच्या अंमलबजावणी बाबत प्रत्येक तीन महिन्यात आढावा घेऊन त्याबाबत प्रगती अहवाल शासनास सादर करणे बंधनकारक असेल.
👇👇👇👇👇👇👇👇
